ब्रेकींग : मित्राचा निर्घृण खून ; नेर तालुक्यातील युवकाची नागपूर येथे हत्या

नागपूर : किरकोळ वादातून मित्राचा निर्घृण खून झाल्याची थरारक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विहिरगावात घडली. हेल्मेट आणि गॅस शेगडीने डोके ठेचून ही हत्या करण्यात आली. 

अनिल मधुकर पवार (३६, रा. पिंपळगाव, नेर, जि. यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. राजू महादेव पवार असे आरोपीचे नाव असून, सध्या तो फरार आहे. अनिल हा नागपूरच्या उमरेड रोडवरील त्रिमूर्ती बारमध्ये काम करत होता. तर, राजू ‘द शिप’ हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. विहिरगावातील मनोज शंकरराव दळणे (४४) यांच्या घरात अनिलने १५ मे रोजी खोली भाड्याने घेतली होती. पाच दिवसांनी राजूही त्याच खोलीत राहायला आला. दरम्यान, अनिल याने कुलरसाठी मनोज यांच्याकडून उधारीवर पैसे घेतले होते. त्यानंतर १ जूनपासून त्याने कामावर जाणे थांबवले होते. याच दरम्यान राजू आणि अनिलमध्ये वाद झाला. या वादातूनच राजूने गॅस शेगडी व हेल्मेटचा वापर करून अनिलच्या डोक्यावर सपासप वार करत त्याचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. खून केल्यानंतर राजूने मृतदेहाचा चेहरा कापडाने झाकला आणि घराला कुलूप लावून फरार झाला. शुक्रवारी रात्री खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिस पाटील प्रमोद कोंगे यांना माहिती दिली. त्यानंतर खोली मालक मनोज दळणे आणि पोलिस कर्मचारी राजू खोरगडे यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अनिलचा मृतदेह अत्यवस्थ अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त रश्मिता राव, सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे, तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. दरम्यान, राजू पवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे. त्याला अटक झाल्यानंतरच हत्येमागील नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments