ब्रेकींग-दुर्गादेवी उत्सवात दोन दुर्दैवी घटना : चिमुकल्याचा नाल्यात मृत्यू; विसर्जनावेळी इसम गेला वाहून

यवतमाळ : दुर्गादेवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात दोन हृदयद्रावक घटना घडल्या. पुसद तालुक्यात बांशी येथे महाप्रसादासाठी जात असताना १० वर्षीय चिमुकल्याचा खोल नाल्यात पडून मृत्यू झाला तर महागाव तालुक्यात टेंभी (काळी) गावात विसर्जनावेळी एक इसम पाण्यात पडून वाहून गेला. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चिमुकल्याचा नाल्यात मृत्यू

पुसद तालुक्यातील बांशी येथे ३ ऑक्टोबर रोजी ही दुर्घटना घडली. सत्यशील गणेश केवटे (वय १०) हा मुलगा गावातील दुर्गादेवी मंदिरात महाप्रसादासाठी जात असताना मार्गातील खोल नाल्यात पडला. पावसामुळे नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ग्रामस्थांनी त्याला तात्काळ बाहेर काढून पुसद उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याची आई तो तीन वर्षांचा असतानाच घर सोडून गेली होती तर वडील मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याने सत्यशील गावातील वसतिगृहात राहत होता. या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

विसर्जनावेळी इसम वाहून गेला

दरम्यान, महागाव तालुक्यातील टेंभी (काळी) येथे ४ ऑक्टोबर रोजी दुर्गादेवीच्या विसर्जनावेळी आणखी एक दुर्घटना घडली. वरुडी येथील पैनगंगा नदीपात्रात  गेलेल्या गणेश हौसाजी सुकळकर (रा. टेंभी) या इसमाचा पाय घसरून तो पाण्यात पडला आणि क्षणात वाहून गेला. या घटनेची माहिती मिळताच महागाव तहसील प्रशासनाने एनडीआरएफच्या पथकाला पाचारण केले. टेंभी, वरुडी आणि कासारबेहळ परिसरात शोधमोहीम राबवण्यात येत आहे. पाण्याचा वेग प्रचंड असल्याने अडचणी येत असल्या तरी जवान आणि ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरूच आहे.

दोन्ही घटनांमुळे दुर्गादेवी उत्सवाच्या जल्लोषात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments