यवतमाळ : शेताच्या रस्त्यावर टाकलेल्या काट्यावरून झालेल्या वादातून एका युवकाचा कुऱ्हाडीने वार करुन खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना आकपुरी शिवारात १४ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. याप्रकरणी वडगाव जंगल पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
सुधाकर महादेव बोटरे (वय २५, रा. धानोरा, ता. यवतमाळ) असे मृतकाचे नाव आहे. याबाबत मृताचा मोठा भाऊ गजानन महादेव बोटरे (वय ५०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलीस ठाण्यात भा.दं.वि. १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गजानन बोटरे व आरोपी रमेश शामराव कुळसंगे (वय ४०, रा. गणेशपूर, ता. यवतमाळ) यांचे शेत शेजारी असून, त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी असलेल्या रस्त्यावर काटे टाकण्यात आले होते. मृतक सुधाकर बोटरे यांनी हे काटे बाजूला केल्याने आरोपी संतापला. त्यातून झालेल्या वादात आरोपीने सुधाकरवर कु-हाडीने पाठीवर व छातीवर जोरदार वार करून गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेतच त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, वडगाव जंगलचे ठाणेदार सपोनि विकास दांडे, पो.उप.नि. भाऊराव बोकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ आरोपी रमेश कुळसंगे यास अटक केली असून, पुढील तपास सपोनि विकास दांडे करीत आहे.
0 Comments