पुसद तालुक्यातील सिंगरवाडी येथील हृदयद्रावक घटना; गावकऱ्यांकडून शोधमोहीम सुरू
यवतमाळ : पुसद तालुक्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे नदी-ओढ्यांना पूर आला असून, सिंगरवाडी येथील एक दाम्पत्य पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. मुलीला भेटण्यासाठी दुचाकीने निघालेले मोहन सकरू राठोड (वय अंदाजे ५५) व त्यांच्या पत्नीचा अद्याप काहीही थांगपत्ता लागलेला नाही.
1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7 ते 7.30 च्या सुमारास ही घटना घडली. पुसदपासून 22 किमी अंतरावर असलेल्या सिंगरवाडी गावात राहत असलेले राठोड दाम्पत्य त्यांच्या भंडारी (ता. पुसद) येथे राहणाऱ्या मुलीकडे निघाले होते. त्यांनी सिंगरवाडी–धानोरा मार्गावरील एक पूल ओलांडला, मात्र समोरील दुसऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्याचे लक्षात आल्याने ते परत फिरले. मात्र परतीच्या मार्गावरील धानोरा–सिंगरवाडी पूलसुद्धा पाण्याखाली गेला होता. परिस्थितीचा अंदाज न येता त्यांनी तोच पूल पार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पाण्याच्या जोरदार प्रवाहात ते दुचाकीसह वाहून गेल्याचा अंदाज आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. काही अंतरावर त्यांची Hero Splendor (MH 29 Q 793) ही दुचाकी सापडली. मात्र अद्याप दोघांचाही शोध लागलेला नाही. या घटनेबाबत पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असली, तरी पोलीस किंवा बचाव पथक घटनास्थळी दाखल झालेले नाहीत.सध्या गावकऱ्यांकडूनच शोधमोहीम सुरू असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments