पतीने केली पत्नीची तलवारीने हत्या

यवतमाळ : चारित्र्यावर संशय घेत पतीने  तलवारीने वार करून पत्नीची हत्या केली. ही थरारक घटना आज मंगळवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास यवतमाळ तालुक्यातील यावली (का.) येथे उघडकीस आली. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पतीसह मुलगाही जखमी झाला आहे.

मृत महिलेचे नाव बेबीबाई दलुराम राठोड (वय ५६) असे असून, तिच्या पतीचे नाव दलुराम राठोड (वय ५९) आहे. पत्नीवर संशय घेत त्यांच्यात वारंवार वाद होत असे. आज पहाटे पुन्हा वाद झाला आणि रागाच्या भरात दलुरामने बेबीबाईंवर तलवारीने सपासप वार केले. तिचा मुलगा संदीप राठोड धावत आला आणि आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने वडिलांना ढकलले असता ते खाटेवर कोसळून जखमी झाले. या झटापटीत बेबीबाईचा मृत्यू झाला. संदीपने वडगाव जंगल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माहिती मिळताच ठाणेदार विकास दांडे, पीएसआय भाऊराव बोकडे, अक्षय डोंगरे आणि पिंटू दोनाडकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. दरम्यान, आरोपी दलुरामवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार विकास दांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

0 Comments