यवतमाळ : सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आणि आंबेडकरी चळवळीच्या विचारांवर ठाम राहणाऱ्या यवतमाळच्या प्रशांत पुरुषोत्तम भवरे यांनी आपल्या जिद्दीने शैक्षणिक क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. बंगळुरूच्या नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी (NLSIU) येथे झालेल्या ३३ व्या दीक्षांत समारंभात त्यांनी एलएलएम पदवीसोबत ‘बेस्ट आउटगोइंग एलएलएम स्टुडंट’ हा मानाचा गोल्ड मेडल पटकावला आहे.
प्रशांतने आपले शालेय शिक्षण यवतमाळमध्ये पूर्ण केलं. पुढे बीएस्सी व जवाहरलाल दर्डा विधी विद्यालयातून एलएलबी मिळवला. परंतु २०१४ मध्ये आर्थिक अडचणींमुळे एम.एस्सी. झूलॉजीचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. पाच वर्षांच्या खंडानंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाची नवी वाट धरली. सोशल मीडियावर त्यांनी स्वतःच्या प्रवासाचा उल्लेख करत कुटुंबीय, मित्रमंडळी आणि क्राउडफंडिंग मोहिमेला साथ देणाऱ्या लोकांचे आभार मानले आहेत. “तुमच्या मदतीशिवाय हे शक्य झालं नसतं,” असं ते स्पष्टपणे म्हणाले.
एलएलएमपूर्वी प्रशांतने लंडनच्या किंग्स कॉलेजमध्ये संशोधन प्रकल्पावर काम केलं होतं. परंतु NLSIU मधील शिक्षणासाठी त्यांना नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनी क्राउडफंडिंगचा आधार घेतला आणि लोकांच्या पाठिंब्याने अभ्यास पूर्ण केला.
प्रशांतने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आधारित लेखन केलं असून, समाजातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवला आहे. शिक्षणातील असमानता, विशेषतः बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत ते संवेदनशील आहेत. त्यांचा विश्वास आहे की, “हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर आंबेडकरी चळवळीने दिलेल्या ऊर्जेचं फलित आहे.” प्रशांत भवरे यांनी आता विदेशातून पीएचडी करण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र निधीअभावी ते स्वप्न धोक्यात येऊ शकतं, अशी खंत त्यांनी जवळच्या मित्रांशी व्यक्त केली. प्रशांतच्या या यशासाठी आंबेडकरी विचारवंत रमेश जीवने, अविचल मेश्राम, मिलिंद मेश्राम, शशांक लांडोळे, सूरज पाटील, ॲड. सूरज भगत, ॲड. मलेश खरतडे, अजय तागडे, पत्रकार राहुल वासनिक, अरविंद रंगारी, ॲड. सनी उके यांच्यासह मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या. यवतमाळ सारख्या शहरातून सुरू झालेला हा प्रवास आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरतो आहे. प्रशांत भवरे यांची कहाणी दाखवते की, सामूहिक पाठिंबा आणि वैयक्तिक जिद्दीच्या बळावर कोणतंही स्वप्न साकार होऊ शकते प्रशांत भवरे यांनी दाखवुन दिले आहे.
0 Comments