यवतमाळ : जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वणी शहरातील टिळक चौक परिसरातून एम.डी. (Mephedrone) विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. या कारवाईत तब्बल ३ लाख २४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला १० सप्टेंबर रोजी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी सापळा लावून युगांत दिनेश दुर्गे (१९, रा. पंचशील नगर, वणी) आणि शाबाज सत्तार मिर्झा (३५, रा. साई नगरी, वणी) यांना पकडले. युगांतच्या पॅन्टच्या खिशातून दोन पाऊचमध्ये एम.डी. पावडर (३.३८ ग्रॅम, किंमत १६,९०० रुपये) सापडली. त्याच्याकडून आणि साथिदाराकडून मिळून दोन मोबाईल व बुलेट मोटरसायकल मिळून एकूण ३.२४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. चौकशीत उघड झाले की, हा एम.डी. युगांत दुर्गेने नागपूर येथील आयुष तांबे याच्याकडून विक्रीसाठी आणला होता. तो शाबाज मिर्झाला देण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. दोघांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक सतीश चवरे, गोपाल उंबरकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.
0 Comments