मुलाचा खून करणाऱ्या आईसह तिच्या-प्रियकराला जन्मठेप

यवतमाळ : नेर तालुक्यातील मोझर गावात घडलेल्या थरारक खुनाच्या प्रकरणी मृतकाची आई आणि तिच्या प्रियकरास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दोघांना दंडाची शिक्षा ठोठावून मृतकाच्या पत्नी व तीन मुलींना नुकसानभरपाई म्हणून ती रक्कम देण्याचा आदेश दिला आहे.

आरोपी शोभा दमडु चव्हाण (वय ५०) हिचा मुलगा कमल चव्हाण (वय ३०) याचा खून तिच्याच प्रियकर नरेंद्र ज्ञानेश्वर ढेंगाळे (वय ४५, रा. मोझर) याच्यासोबत संगनमत करून केला. ३ ऑगस्ट २०२० च्या रात्री कमल घरी परतल्यावर त्याने आई व तिचा प्रियकर एकत्र आढळून आल्याने तो संतापला. यामुळे दोघांनी मिळून लोखंडी सराट्याने त्याचा खून करून मृतदेह स्मशानभूमीत नेऊन टाकला. या प्रकरणी सुरुवातीला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार पंकज कावरे याने सत्य कबूल केले असले तरी न्यायालयात तो फितूर झाला. त्यामुळे प्रकरण परिस्थितीजन्य पुराव्यावर आले. डॉक्टरांचा अहवाल, तपास अधिकाऱ्यांचे पुरावे व सरकारी वकीलांच्या युक्तिवादांनंतर न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. 

जिल्हा न्यायाधीश-१ तथा अति. सत्र न्यायाधीश एस. यु. बघेले यांनी दिलेल्या निकालानुसार, आरोपी नरेंद्र ढेंगाळे व शोभा चव्हाण यांना कलम ३०२ सहवाचन ३४ भा. दं. वि. अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. नरेंद्र ढेंगाळेला ५० हजार व शोभा चव्हाणला १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास अनुक्रमे दोन वर्षे व सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच कलम २०१ अंतर्गत नरेंद्रला दोन वर्षे शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही दंडाची रक्कम मृतकाच्या पत्नी व तिन्ही मुलींना नुकसानभरपाई म्हणून देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. तसेच खोटे साक्ष देणाऱ्या साक्षीदाराला शासनास कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी युक्तिवाद केला, तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी महेंद्र भोवते यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments