पुरात अडकले शेतकरी : झाडावर जीव वाचवण्यासाठी दोन शेतकऱ्यांची झुंज

तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांची प्रसंगावधानाने बचाव मोहीम यशस्वी

यवतमाळ : पूराच्या पाण्याने गावाला वेढा घातला, जीव वाचवण्यासाठी दोन शेतकरी लिंबाच्या झाडावर अडकून बसले होते… मृत्यू आणि जीवनाच्या सीमेवरचा हा संघर्ष शेवटी प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुखरूप संपला.

आर्णी तालुक्यातील खंडाळा शिवारात काल संध्याकाळी देवगाव प्रकल्पाचे सांडव्याचे पाणी घुसले. या पुराच्या पाण्यात शेतकरी जीवन राठोड व नितेश राठोड अडकले. वाढत्या पाण्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी जवळच्या लिंबाच्या झाडाचा आधार घेतला आणि जवळपास तासभर मृत्यूच्या छायेत थांबावे लागले. घटनेची माहिती मिळताच आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःच घटनास्थळी धाव घेतली. तालुका कार्यालयातून लाईफ जॅकेट, लाईफ बॉय आणि दोरखंड घेऊन ते खंडाळ्यात पोहोचले. स्थानिक तरुणांच्या मदतीने राबविलेल्या थरारक बचाव मोहिमेत रात्री ९.५३ वाजता दोन्ही शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. क्षणार्धात गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तहसीलदार वाहुरवाघ यांची धाडसी कृती आणि गावकऱ्यांचे साहस यामुळे दोन शेतकऱ्यांचे प्राण वाचले.

Post a Comment

0 Comments