ब्रेकींग: रेल्वे खड्ड्यात पडून चार बालकांचा मृत्यू

यवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गावरील पुलाच्या बांधकामा दरम्यान मोठी दुर्घटना घडली. दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरातील प्रस्तावित पुलासाठी खोदण्यात आलेल्या मोठ्या खड्ड्यात बुडून चार बालकांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

रीहान असलम खान (१३), गोलु पांडुरंग नारनवरे (१०), सोम्या सतीश खडसन (१०), वैभव आशीष बोधले (१४) सर्व रा. दारव्हा अशी मृतकांची नावे आहे. दारव्हा रेल्वे स्टेशन परिसरातील प्रस्तावित पुलासाठी खोदण्यात आलेला खड्डा सततच्या पावसामुळे पाण्याने तुडुंब भरलेला होता. रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था न करता खड्डा उघडाच ठेवण्यात आला होता. खेळता खेळता काही मुले तेथे गेली. या खड्ड्यात पडल्याने चार मुले अचानक बुडाली. यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना बाहेर काढले व तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, जखमी मुलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजीवनी रुग्णालय, यवतमाळ येथे हलविण्यात आले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौघांना मृत घोषित केले. मृत मुलांची नावे रीहान असलम खान (१३), गोलु पांडुरंग नारनवरे (१०), सोम्या सतीश खडसन (१०), वैभव आशीष बोधले (१४)(सर्व रा. दारव्हा) अशी आहेत. या दुर्घटनेनंतर बांधकामस्थळी सुरक्षा उपाययोजना न केल्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चार निरपराध बालकांचा बळी गेला असून, याबाबत चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments