पूस व पेनगंगा नदीला पूरस्थिती
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार अप्पर पूस प्रकल्प आज सकाळी ६ वाजता १०० टक्के भरला असून २७ सेंमी. ओव्हरफ्लो सुरु झाला आहे. त्यामुळे पूस नदीकाठच्या गावांना तातडीने सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ईसापूर धरणाचे ३ गेट ५० सेंमी ने उघडून ४९८८ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. संध्याकाळी ६ वाजता पाणीपातळी ४४०.८५ मीटरवर पोहोचली होती. धरणातील साठा ९८.५१ टक्के भरला असून पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्ग वाढविण्याची शक्यता आहे.
वाहतूक ठप्प
उमरखेड, पुसद व महागाव तालुक्यात नदी-नाले
तुडुंब भरल्याने २० हून अधिक मार्ग बंद झाले आहेत. उमरखेड तालुक्यात
चातारी-उंचवडद, बिटगाव-चिंचोली
संगम, गांजेगाव-हिमायतनगर,
कोरटा-किनवटसह १५ पेक्षा जास्त
रस्त्यांवर वाहतूक बंद झाली आहे. पुसद तालुक्यात
शेंबाळपिंपरी-इसापूर, धानोरा-वडगाव,
हिवळणी मार्ग बंद आहे. मांडवी-पाटणबोरी,
यरणगाव-सारफळी, चिखली-किनवट पुलांवरून पाणी वाहत आहे.
घरांची पडझड
उमरखेड तालुका : चातारी येथे १३०, शिवाजीनगर येथे तब्बल २८० घरांना फटका, तर सावळेश्वर येथे २० घरं पाण्यात गेली. बाभुळगाव तालुका : करळगाव, तरोडा, सुकळी व कोंडा गावात पावसाने कहर केला असून ५ घरांच्या भिंती कोसळल्या. पुसद तालुका : १० ऑगस्टपासून आतापर्यंत एकूण २२७ घरांची पडझड झाली आहे.
पिकांचे मोठे नुकसान
बाभुळगाव तालुक्यात तरोडा येथील शेतकरी अभिजित भोयर यांच्या शेतातील ०.१० हे.आर. कापूस व तूर पिकाचे नुकसान. पुसद तालुक्यात २,५३५ हे.आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल.शेतात पाणी शिरल्याने कपाशी व तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे.
मदतकार्य सुरू
पूरग्रस्त भागात प्रशासनाकडून स्थलांतर, निवारा केंद्रे व मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. उमरखेड तालुक्यात दराटी गावात पोलीस ठाणेदार योगेश वाघमारे, पोलीस पाटील पंजाब पवार व समाजातील कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसाठी खिचडीचे वाटप केले. जिल्हा प्रशासन, पोलीस, नगर परिषद, तसेच सामाजिक संघटना नागरिकांच्या मदतीला धावल्या आहेत.
प्रशासनाचा इशारा
"धरणातील आवक वाढत असल्याने विसर्ग वाढवला जाणार आहे. नागरिकांनी नदीकाठावर जाणे टाळावे. पूरकाठच्या गावातील नागरिकांनी सुरक्षित स्थळी हलवावे." इसापूर धरण पुरनियंत्रण कक्ष
0 Comments