पतीने केली पत्नीची हत्या; आरोपी पतीला ठोकल्या बेड्या

 

यवतमाळ : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करून तिची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना यवतमाळ तालुक्यातील रूई येथे बुधवारी (ता. ६ ऑगस्ट) दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी काही तासांत आरोपी पतीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मंदा राहुल डोंगरे (वय ४०) असे मृतक पत्नीचे नाव असून, राहुल श्रीराम डोंगरे (वय ४१) रा. रूई, ता. यवतमाळ असे आरोपी पतीचे नाव आहे. राहुल हा कुटुंबासह संजू इंगळे यांच्या शेताजवळील बंड्यावर राहून मजुरी करत होता. पत्नी मंदा व तीन मुलांसह त्याचे कुटुंब तेथे वास्तव्यास होते. आरोपी राहुल डोंगरे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद घालत होता. बुधवारी दुपारी साडेएक वाजताच्या सुमारास या वादाला तीव्र स्वरूप आले. संतापलेल्या राहुलने घरातच असलेल्या कुऱ्हाडीने पत्नीच्या डोक्यावर जोरदार वार केला. यात मंदा गंभीर जखमी झाली. हल्ल्यानंतर राहुलने घराचे दार बाहेरून बंद केले व तेथून पलायन केले. दरम्यान, शाळेतून परतलेल्या मोठ्या मुलीच्या लक्षात ही घटना आली. तिने आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. ग्रामिण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्याची दखल घेत ग्रामिण पोलिसांनी आरोपी राहुल डोंगरे याचा शोध घेत त्याला काही तासांत ताब्यात घेतले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण ठाण्याचे ठाणेदार सुनील नाईक, सहायक पोलिस निरीक्षक प्रविण मानकर, पोलिस उपनिरीक्षक गजानन शेजुळकर व पथकातील खुशाल राठोड, निरज पातूरकर, सचिन पातकमवार, निलेश शिरसाट, रूपेश नेव्हारे, गजानन गोडंबे, सुदर्शन गणवीर, विक्रांत लांडगे यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments