यवतमाळ : पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पतीने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत निघृण खून केल्याची थरारक घटना शहरातील चौसाळा रोडवरील बोदड परिसरात गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
मृत पत्नीचे नाव दिव्यानी चंद्रशेखर ठक (२७) असे असून, आरोपीचे नाव चंद्रशेखर उर्फ चंदू नारायण ठक (३०, रा. सोनई नगर, भोसा रोड, यवतमाळ) असे आहे. चंद्रशेखर व दिव्यानी यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना अडीच वर्षांचा मुलगा आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून चंद्रशेखर पत्नीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन सतत वाद करत होता. त्यातूनच पत्नी दिव्यानी ही काही दिवसांपासून माहेरी, बोदड येथे राहत होती. गुरुवारी चंद्रशेखर आपल्या मुलाला भेटण्यासाठी बोदड येथे गेला. मात्र तिथे पुन्हा एकदा दोघांत जोरदार वाद झाला. रागाच्या भरात चंद्रशेखर याने अचानक चाकू काढून दिव्यानीच्या छातीवर आणि गळ्यावर सपासप वार केले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रोहित चौधरी यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. आरोपी चंद्रशेखर ठक याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास लोहारा पोलीस करीत आहेत.
0 Comments