पाटणबोरीत जबरी चोरीचा प्रयत्न, धाडसाने केला प्रतिकार
यवतमाळ : पाटणबोरी येथील वासुदेव उपलेंचवार या व्यापाऱ्याच्या घरी काल रात्री साडेनऊच्या सुमारास एका अज्ञात इसमाने बंदूक दाखवत जबरी चोरीचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली. मात्र व्यापाऱ्याच्या धाडसामुळे चोराचा प्रयत्न फसला आणि तो पळून गेला.प्राप्त माहितीनुसार, काल दिनांक ६ ऑगस्ट रोजी रात्री ९.२० वाजता चेहऱ्यावर रुमाल बांधलेला व लाल टी-शर्ट परिधान केलेला एक अज्ञात युवक उपलेंचवार यांच्या घरी घुसला. दरवाजा बंद असतानाही त्याने ढकलून घरात प्रवेश केला. व्यापारी वासुदेव उपलेंचवार यांनी त्याला थांबवत विचारणा केली असता, त्याने बंदूक काढून त्यांच्या दिशेने ताणली आणि "बाजूला हो" अशी धमकी देऊ लागला. अचानक आलेल्या या प्रसंगातही वासुदेव उपलेंचवार यांनी प्रसंगावधान राखत चोराला जोरात धक्का देऊन पोर्चमध्ये ढकलले व दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दरवाज्याजवळ असलेल्या काचेमधून त्यांनी चोर कुठे गेला हे पाहण्याचा प्रयत्न केला. परंतु चोर पसार झाला होता. यानंतर त्यांनी शेजारी राहणारे डॉ. प्रवीण उपलेंचवार व सोनू पवार यांना फोन करून माहिती दिली. काही वेळातच ते काही लोकांना घेऊन घटनास्थळी आले. शोधाशोध घेत असताना घराच्या मागे असलेल्या बांधकामस्थळी एक युवक लाल टी-शर्टमध्ये जखमी अवस्थेत दिसून आला. विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला.
घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांना दिल्यानंतर रात्री १० वाजताच्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संशयिताची चौकशी केली. दरम्यान, रात्री १ वाजता फिर्यादीकडून जबानी तक्रार घेत ऑनलाईन एफआयआर दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एपीआय पेंढारकर करीत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे पाटणबोरी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील पोलीस आऊटपोस्टवर रात्री कोणीही उपस्थित राहत नसल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळेस दोन पोलिसांची कायमस्वरूपी ड्युटी लावावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
0 Comments