यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी श्री गणेशाला साकडे घातले. ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात त्यांच्या निवासस्थानी श्री गणेशाची स्थापना झाली, ज्यामुळे यवतमाळात गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
यवतमाळात आज सकाळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या निवासस्थानी भक्तीमय वातावरणात श्री गणेशाची स्थापना झाली. अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि निरोगीपणा यावा, यासाठी राठोड कुटुंबाने बाप्पाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली.
ना. संजय राठोड, त्यांच्या सहचारिणी शीतल राठोड आणि मुलगा सोहम राठोड यांनी सकाळी यवतमाळातील पोस्टल ग्राऊंड येथून श्री गणेशाची मूर्ती घरी आणली. यावेळी छत्रपती ढोल ताशा पथकाने टिळकवाडी येथील राठोड यांच्या निवासस्थानी ढोल-ताशांचा गजर करत उत्सवाला रंगत आणली. चाहते आणि समर्थकांच्या उपस्थितीत श्री गणेशाचे आगमन झाले. राठोड कुटुंबाने विधिवत पूजन आणि प्राणप्रतिष्ठा केली.
माध्यमांशी बोलताना संजय राठोड म्हणाले, "गणेशोत्सव हा आनंद आणि समृद्धीचा सण आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे संकट दूर होऊन त्यांच्या आयुष्यात सुखाची लाट यावी, यासाठी मी बाप्पाला साकडे घातले आहे. सर्वांना निरोगी आणि समृद्ध आयुष्य लाभो, हीच माझी प्रार्थना आहे."
या प्रसंगी शेखर राठोड, विकास क्षीरसागर, अमित मेहरे, घनश्याम नगराळे, संजय हातगावकर, गजानन इंगोले, सचिन चव्हाण, स्वप्नील राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यवतमाळात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, बाप्पाच्या आगमनाने सर्वत्र आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे.
0 Comments