ब्रेकींग: चोरीच्या रागातून इसमाचा खून

वणीतील गुन्ह्याचा 9 दिवसांनी उलगडा, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई



यवतमाळ : वणी शहरातील मांडवकर बार मागील गौरी लेआउट परिसरात 18 ऑगस्ट रोजी आढळलेल्या 56 वर्षीय व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्याचा अखेर 9 दिवसांनी पर्दाफाश झाला. चोरीच्या रागातून हा खून झाल्याचे समोर आले असून, यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला अटक करून गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
संजय कटोते (वय 21, रा. नवीन वाघदरा, वणी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. 18 ऑगस्ट रोजी गौरी लेआउट परिसरात एका 55-56 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख देवराव दत्तु गुजेकर (वय 56, रा. मुळगव्हाण, ता. झरीजामणी, वणी) अशी त्यांची भाची शालु राजू लक्षकर (वय 30, रा. खरबडा मोहल्ला, वणी) यांनी पटवली. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवि कलम 103(1) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपी अज्ञात असल्याने पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वणी येथे तळ ठोकून तपास सुरू केला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी, तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक मुखबिरांचे जाळे यांचा वापर करूनही सुरुवातीला ठोस पुरावे मिळाले नाहीत. मात्र, पथकाने  तपास पुढे नेला. 26 ऑगस्ट रोजी गोपनीय सूत्राकडून गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल (क्रमांक MH-12-PX-4611) लालगुडा चौक परिसरात दिसल्याची माहिती मिळाली. यानुसार, पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताने आपले नाव आशिष संजय कटोते (वय 21, रा. नवीन वाघदरा, वणी) असे सांगितले.
चोरीच्या रागातून खून; आरोपीची कबुली
पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आशिषने खुनाची कबुली दिली. त्याने सांगितले की, घटनेपूर्वी चार दिवस आधी तो लालगुडा चौकात दारू पिऊन झोपला असताना त्याच्या खिशातील 10 हजार रुपये आणि मोबाइल चोरीला गेले होते. नंतर त्याला कळले की, ही चोरी मृतक देवराव गुजेकर याने केली होती. याचा राग मनात ठेवून 18 ऑगस्टच्या रात्री त्याने देवरावला लालगुडा चौकातून मोटरसायकलवर बसवले आणि दारू पिण्याच्या बहाण्याने गौरी लेआउट परिसरात नेले. तिथे पैशांबाबत विचारणा केली असता, देवरावने स्पष्ट उत्तर न दिल्याने रागाच्या भरात आशिषने त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि दगडाने ठेचून खून केला. आरोपी आशिष कटोते याला वणी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास वणी पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश चवरे, गोपाल उंबरकर, सहायक पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोउपनि गजानन राजमुल्लु, धनराज हाके, पोलीस कर्मचारी सैयद साजिद, सुनिल खंडागळे, रुपेश पाली, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सुनिल पैठणे, आकाश सूर्यवंशी, नरेश राऊत, सतीश फुके, पठाण आणि वणी पोलीस ठाण्याचे पोउपनि धीरज गुन्हाणे व डीबी पथकाने केली. 

Post a Comment

0 Comments