यवतमाळ : पोलिस दलावर काळाने अवघ्या तीन दिवसांत दुहेरी आघात केला आहे. मारेगाव पोलिस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ ठाणेदार उमेश बेसुरकर यांचे हृदयविकाराने निधन झाल्याची दुखद घटना ताजी असतानाच, नेर पोलिस ठाण्यातील शिपाई अंकित दीपक जिरापुरे (वय ३०) यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाले. एकाच आठवड्यातील या दोन मृत्यूंमुळे पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
अंकित जिरापुरे हा अंनुकंपावर जिल्हा पोलीस दाखल झाला होता. एक दिड वर्षापूर्वी दारव्हा पोलीस ठाण्यातून त्याची नेर पोलीस ठाण्यात बदली झाली होती. तेव्हापासून तो नेर ठाण्यात कार्यरत होता. तो अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, नातेवाईक व बराच मोठा आप्त परिवार आहे. घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने आईवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यसंस्कारावेळी आईचा आक्रोश अन् नातेवाइकांचा टाहो यामुळे परिसरात शोकमय वातावरण होते.
पोलिस वडीलांचेही कर्तव्यावर निधन
अंकितचे वडील दीपक जिरापुरे हे पण पोलीस दलात सेवेत होते. २०११ मध्ये दारव्हा येथे पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असताना आजारपणामुळे कर्तव्यास्थानी निधन झाले होते. एकाच कुटुंबातील दोन पिढ्यांनी पोलिस सेवेत असताना जीव गमावल्याने ही घटना हृदयद्रावक ठरली आहे.
पोलिसांवरील ताण वाढला
पोलिस कर्मचाऱ्यांवरील अनियमित कामाचे तास, सततचे बंदोबस्त, गुन्ह्यांच्या तपासाची धावपळ, अपुरी झोप आणि आहारातील अनियमितता यामुळे हृदयविकारासारख्या आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांच्या आरोग्यासाठी नियमित तपासण्या, मानसिक आधार आणि विश्रांतीच्या सुविधा याबाबत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जीव धोक्यात घालणारे पोलिस स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत असुरक्षित ठरत असल्याची वेदनादायी वास्तविकता या घटनांनी समोर आणली आहे. अनिश्चित कामाचे तास, उत्सव-मोर्चांचे बंदोबस्त आणि तपासाची जबाबदारी यामुळे पोलिसांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य धोक्यात येत आहे. परिणामी, तरुण वयातच हृदयविकारासारख्या आजारांनी पोलिसांचा जीव घेतला जात आहे.
0 Comments