ब्रेकींग: भाईची निघृण हत्या, दोन मारेकरी जेरबंद

तलवार व कोयत्याने केले वार; वाघाडी गावात थरकाप

राहुल वासनिक / यवतमाळ 

......................................

दारुच्या नशेत जुन्या वादाला तोंड फोडत गावातील दुर्गा देवीच्या ओट्यावर थांबलेल्या भाईगिरी करणा-या तरुणावर दोघांनी तलवार व कोयत्याने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला.  ही खळबळजनक घटना सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास वाघाडी (ता. यवतमाळ) येथे घडली.

महेश नरेश कोल्हेकर (३२, रा. चापडोह) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी उमेश शिरभाते (१९) व रोशन राउत (२५, दोघे रा. वाघाडी) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोल्हेकर हा गेल्या तीन-चार वर्षांपासून वाघाडी येथे आपल्या महिला मित्रासोबत राहत होता. शिंदे यांच्या शेतात सोकारी म्हणून काम करणारा महेश हा दारूच्या आहारी गेला होता. काही महिन्यांपूर्वी दारुच्या नशेत त्याने उमेश शिरभाते यांच्या आजीला मारहाण केली होती. या प्रकारामुळे उमेश व महेशमध्ये वाद झाला होता. मात्र, तो तात्पुरता मिटलेला होता.

सोमवारी (४ ऑगस्ट) रोजी सायंकाळी महेश गावात आला व दुर्गा देवीच्या ओट्यावर बसून होता. रात्री साडेनऊच्या सुमारास महेशवर अचानक तलवार व कोयत्याने हल्ला करण्यात आला. रोशन राउत व उमेश शिरभाते या दोघांनी मिळून डोक्यावर, छातीवर, पोटावर आणि चेहऱ्यावर सपासप वार करत त्याला रक्तबंबाळ केले. हे दृश्य महेशसोबत राहत असलेल्या सिताबाई बोरकर यांच्या आईने प्रत्यक्ष पाहिले.

घटनेनंतर आरोपी पळून गेले. जखमी अवस्थेतील महेशला पाहून स्थानिकांनी मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सिताबाई बोरकर हिने पोलिसात तक्रार दिल्यानंतर यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनिल नाईक व पोलीस पधकाने तपास चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पुढील तपास सुरु आहे. 

Post a Comment

0 Comments