ब्रेकींग: लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात

अमरावती : घरकुलाच्या दुसऱ्या टप्प्याची रक्कम खात्यात जमा करून देण्यासाठी गृहनिर्माण अभियंत्याने तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. विशेष म्हणजे ही रक्कम स्वतः न घेता त्याच्या परीचितामार्फत घेतली गेली. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने सावधपणे सापळा रचत हे दोघेही जाळ्यात पकडले. ही कारवाई चांदूर रेल्वे येथील पंचायत समिती समोरील चहा कॅन्टीनमध्ये सोमवारी (४ ऑगस्ट) सायंकाळी ३.४५ ते ४.०२ या दरम्यान करण्यात आली.

तक्रारदार (वय ५०, रा. सोनगाव, ता. चांदूर रेल्वे) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यांना व त्यांच्या वडिलांचे घरकुल दुसऱ्या टप्प्याचे प्रत्येकी ₹७०,००० इतके अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी गृहनिर्माण अभियंता राहुल रामकृष्ण नांदणे (वय ३०, रा. देवरा, ता. चांदूर रेल्वे, सध्या रा. धनश्री विहार, अमरावती) यांनी ₹५,००० लाचेची मागणी केली होती. या तक्रारीवर ४ ऑगस्ट रोजी पडताळणी करून सापळा रचण्यात आला. सापळा दरम्यान, आरोपी नांदणे यांनी सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारण्याऐवजी आपल्या परीचित प्रविण भास्कर धाडसे (वय ३८, व्यवसाय – मजुरी, रा. पळसखेड, ता. चांदूर रेल्वे) यांच्यामार्फत घेतली. तक्रारदाराने धाडसेकडे लाचेची रक्कम दिल्यानंतर, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध पोलीस स्टेशन चांदूर रेल्वे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मारोती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिन्द्र शिंदे, सुनिल किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, पोलीस निरीक्षक सुजाता बन्सोड, पोलीस निरीक्षक प्रमोद रायपुरे, राजेश मेटकर, महेंद्र साखरे, शि. शैलेश कडू आणि पो.उपनि. सतीश किटूकले यांनी केली. राहुल नांदणे यांचे प्रकरण मा. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.

सर्व नागरिकांना आवाहन 

कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी व्यक्ती लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती –

📞 दूरध्वनी : ०७२१-२५५२३५५ / २५५३०५५

📞 टोल फ्री क्रमांक : १०६४

📍 ललित सेंटर, परांजपे कॉलनी, अमरावती

Post a Comment

0 Comments