राहुल वासनिक / यवतमाळ
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची चाहूल लागताच जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्ष ‘ॲक्टीव्ह’ झाले असून, तयारीला सुरुवात केली आहे. यवतमाळमधील जिल्हा रेस्ट हाऊस सध्या राजकीय गजबजाटाने भरले असून शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भाजप, मनसेसह अन्य पक्षांनी बैठका सुरू केल्या आहेत. पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात सुसूत्रता निर्माण करत गावपातळीवर प्रचार आराखड्यांची आखणी करण्यात येत आहे.
शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी रेस्ट हाऊसमध्ये स्वतंत्र गटनेत्यांच्या उपस्थितीत रणनीती बैठका घेतल्या. तर भाजपने आदिवासी मंत्री यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मतदारसंघनिहाय कामाची दिशा ठरवली. मनसेने देखील नव्या जोमात मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, राजकीय पक्षांसोबतच विविध सामाजिक संघटनांनीही आपली भुमिका स्पष्ट करत समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच सामाजिक संघटनांनी बैठकांचा सपाटा लावला आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते विविध समस्या, मागण्या संदर्भात चर्चा करीत असून, त्या कशा सोडविता येईल यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक संघटना यांचीही एकी करून सामूहिक मागण्यांचा मसुदा तयार केला जात आहे.
स्थानिक पातळीवर रचल्या जाणाऱ्या सत्तेच्या गणितात प्रत्येक घटक महत्त्वाचा असल्याने सर्वच पक्षांनी तळागाळातील जनतेशी संपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. विकासकामे, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांभोवती प्रचारफेरी आखली जात असून आगामी काही दिवसांत तालुकानिहाय बैठका, प्रभातफेऱ्या आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन होणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांकडून मिळत आहे.
एकूणच, यंदाची स्वराज्य संस्था निवडणूक ही नेहमीच्या पेक्षा अधिक चुरशीची व सामजिक समन्वय साधणारी ठरण्याची चिन्हे असून रेस्ट हाऊसमधील वाढता राजकीय व सामाजिक वावर त्याचेच स्पष्ट लक्षण म्हणावे लागेल.
0 Comments