“संघटन मजबुत करण्यासह शेतकरी, बेरोजगार युवक यांच्यासाठीच लढा देणार” : अभिलाष खंडारे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, यवतमाळ

राहुल वासनिक / यवतमाळ

यवतमाळ : फुलेशाहूआंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक चळवळीतून आपला प्रवास सुरू केलेले अभिलाष खंडारे आज संभाजी ब्रिगेडच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. नुकत्याच पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत त्यांची नियुक्ती जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर तहलका टाईम तर्फे घेतलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी संघटनेचे भविष्यातील धोरण, शेतकऱ्यांची परिस्थिती, बेरोजगारीचा प्रश्न आणि राजकारणातील संभाजी ब्रिगेडची भूमिका स्पष्टपणे मांडली.


मी सामाजिक चळवळीपासूनच राजकीय प्रवास सुरू केला. सुरुवातीला मराठा सेवा संघाच्या माध्यमातून काम केले. २०१६ मध्ये संभाजी ब्रिगेड हा राजकीय पक्ष म्हणून उभा राहिला आणि मी त्याच्याशी जोडला गेलो. आमचे ध्येय स्पष्ट आहे समाजातील वंचित, शेतकरी, कामगार आणि युवकांसाठी संघर्ष करणे,” असे खंडारे सांगतात.

संभाजी महाराजांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी ते संघटनेत नवे प्रयोग करणार आहेत. धाडसी धडे, निबंध स्पर्धा, परीक्षा अशा उपक्रमांमधून तरुणांना जोडण्याचा प्रयत्न आहे. संघटना केवळ एका समाजापुरती मर्यादित नसून प्रत्येक जातीधर्मातील व्यक्तींना समान स्थान देणार आहोत,” असे खंडारे नमूद करतात.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती पाहून ते अतिशय अस्वस्थ आहेत. अलीकडील अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना किमान एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. आत्महत्या थांबवायच्या असतील तर सिंचन व्यवस्था मजबूत करावी आणि शेतीमालाला हमीभाव द्यावा. सरकार या गोष्टीकडे उदासीन आहे,” अशी तीव्र टीका ते करतात.

बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलताना खंडारे स्पष्ट म्हणाले, जिल्ह्यात उद्योगधंदे नाहीत. एमआयडीसीतले अनेक उद्योग बंद पडले आहेत. युवक हातावर पोट ठेवून बसले आहेत. हे चित्र बदलले नाही तर सामाजिक असंतोष वाढेल. रोजगार निर्मितीसाठी आंदोलन उभारावे लागेल.

युतीच्या संदर्भात ते म्हणाले, सध्या आमची कोणत्याही पक्षासोबत युती नाही. पण जो पक्ष संभाजी ब्रिगेडच्या विचारांना मान देईल, सत्तेत वाटा देईल, त्याच्यासोबत चर्चा होऊ शकते. मात्र आमच्या विचारसरणीशी तडजोड केली जाणार नाही.

नव्या जबाबदारीमुळे उत्साहित असलेले खंडारे शेवटी म्हणाले, संभाजी महाराजांचे विचार हेच आमचे शस्त्र आहे. शेतकरी, बेरोजगार, विद्यार्थी आणि कामगार यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणारच. लोकांनी आमच्यासोबत यावे, हा आमचा संदेश आहे.


मुलाखत : राहुल वासनिक, संपादक, तहलका टाईम मो. 9890875261, 9404486361

Post a Comment

0 Comments