यवतमाळ : पोळ्याच्या उत्साहाच्या दिवशी बेलोरा येथे एक हृदयद्रावक घटना घडली. बैल धुताना पाण्यात बुडून एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
मृत तरुणाचे नाव चेतन कवडू चतुरकार (वय २५) असे असून तो शेतकरी मजूर होता. आज शुक्रवार दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बेलोरा गावात डीबीएल कंपनीने मुरुम खोदून नेल्यानंतर १५ फूट खोल खड्डा उघा राहिला होता. पावसामुळे त्यात पाणी साचले होते. पोळ्याच्या निमित्ताने बैल धुण्यासाठी चेतन या खड्ड्यात गेला. यावेळी बैलाची दोरी सुटल्याने तोल जाऊन तो पाण्यात कोसळला. चेतनला पोहता येत नसल्याने काही क्षणातच तो पाण्याखाली गडप झाला. त्याचे वडील आणि दोन मित्र त्याच्यासोबत होते, मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने मदत करू शकले नाहीत. ग्रामस्थांनी धाव घेऊन चेतनला बाहेर काढले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे चतुरकार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावभर शोककळा पसरली आहे.
1 Comments
Very nice
ReplyDelete