एस टी च्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; हृदय शरीराबाहेर पडले

दारव्हा : दारव्हा बसस्थानकात मंगळवारी सकाळी घडलेल्या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. 

दादाराव सोमाजी वानखडे (वय ७५) रा. भांडेगाव असे मृतकाचे नाव आहे. आज सकाळी ते बसस्थानकात बसची वाट पापहत होते. दारव्हा आगाराची बस (क्रमांक MH 40 Y 5811) तेलगव्हाणवरून येत होती. प्रस्तावित बांधकामामुळे बसस्थानकातील प्रवेशमार्ग अरुंद असल्याने बस चालकास वाहन नियंत्रित करता आले नाही. यावेळी बसच्या धडकेत वानखडे हे मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की मृतकाचे हृदय शरीराबाहेर पडले.

घटनेनंतर ठाणेदार शिवप्रकाश मुळे यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. बस चालक संजय भाऊराव बरडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. या अपघातामुळे बसस्थानकाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवाशांना प्रतीक्षेसाठी आणि वाहन उभे करण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने निर्माण होणारी तारांबळ व धोक्यांचा प्रश्न प्रवासी उपस्थित करीत आहेत. आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

मुलाचाही अपघाती मृत्यू

काही वर्षांपूर्वी वानखडे यांचा मुलगाही भांडेगाव येथे बसच्या अपघातात मृत्युमुखी पडला होता. आता वडिलांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मागे पत्नी, तीन मुली व नातवंडे असा आप्तपरिवार आहे.



Post a Comment

0 Comments