यवतमाळ : बाभुळगाव तालुक्यातील यावली येथे एका दारुड्या मुलाने घराच्या वादातून आपल्या जन्मदात्या आई-वडिलांवर फावड्याने हल्ला करून गावात खळबळ उडवून दिली. या हल्ल्यात आईचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. ही संतापजनक घटना बुधवार, १६ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
पार्वताबाई डेबुर (वय ६२) असे मृतकाचे नाव आहे. तर
महादेव डेबुर (वय ६५) असे
जखमीचे नाव आहे. जितेंद्र डेबुर (वय
३५) असे आरोपीचे नाव असून, तो
दारूच्या आहारी गेला होता. गावातील जुनं घर वडिलांनी त्याच्या बहिणीच्या नावावर
केल्यामुळे जितेंद्रने आई-वडिलांशी सतत वाद घालण्याची सवय लावली होती. त्याचे वडील महादेव डेबुर (वय ६५) यांनी जितेंद्रचे दारूचे व्यसन पाहता घर मुलीच्या नावे करून दिले होते, आणि हेच कारण त्याच्या रागाचे मुळ ठरत होते. बुधवारी
रात्री पुन्हा घराच्या मालकीवरून वाद झाल्यानंतर जितेंद्रने नशेच्या अवस्थेत आपल्या
आई-वडिलांशी झगडा केला. अचानक
त्याने जवळच पडलेला लोखंडी फावडा उचलून आई पार्वताबाई डेबुर (वय ६२) आणि वडील महादेव डेबुर यांच्यावर वार केले. पार्वताबाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर
गंभीर जखमी महादेव डेबुर यांना तत्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणात बाभुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा
दाखल करण्यात आला असून, आरोपी
जितेंद्र डेबुर याच्यासह त्याची पत्नी सुशीला डेबुर (वय ३०)
हिला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर
यावली गावात प्रचंड संतापाची लाट पसरली असून, एका पोटच्या मुलानेच
आपल्या आईचा जीव घेतल्याने ग्रामस्थ सुन्न झाले आहेत. घटनेचा
पुढील तपास पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी व जमादार दीपक आस्कर हे करत
आहेत.
0 Comments