वणी (यवतमाळ) : “दुसऱ्यासाठी जगणं” हे ज्यांचं जीवनवाक्य होतं, अशा समाजसेवक आणि वणीतील शाळा क्रमांक ८ चे उच्च श्रेणी मुख्याध्यापक दिलीप नारायणराव कोरपेनवार (वय ५७, रा. रविनगर) यांचे आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण वणी शहरात शोककळा पसरली आहे.
कोरपेनवार हे चिमूर येथे कामानिमित्त मालवाहू पिकअपने (टाटा एस) जात असताना रान तळोदी शिवाराजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या टँकरने (क्र. MH-34-BJ-6445) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. धडक पॅसेंजर साईडला बसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघाताच्या वेळी पिकअपमध्ये कोरपेनवार यांच्यासह चालक आणि क्लिनरही होते. दोघेही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. कोरपेनवार हे फक्त शिक्षक नव्हते, तर एक जिवंत आदर्श होते. त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी झोकून देऊन काम केले. वृक्ष लागवड, गरीब विद्यार्थ्यांना मदत, शाळेत गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे ते वणीकरांच्या हृदयात घर करून होते. नगर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक उपक्रम राबवले होते. त्यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.
0 Comments