बोरीअरब - दारव्हा तालुक्यातील बोरीअरब गावाजवळ अडान नदीच्या पात्रातील जुन्या पुलाच्या रपट्यावरून पाणी वाहत असल्याने येथे मोठा अपघात घडला. विठ्ठलराव पत्रे (वय ७०, रा. हणार बोरीअरब) हे आज सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास रपटा पार करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पाण्याचा ओढ प्रचंड असल्याने ते तोल जाऊन नदीच्या प्रवाहात वाहून गेले. घटनेच्या वेळी परिसरातील नागरिक घटनास्थळी उपस्थित होते. मात्र काहींनी मदतीचा प्रयत्न करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली, अशी खंत व्यक्त होत आहे. योग्य वेळी धाडस करून मदत केली असती तर पत्रे यांचे प्राण वाचले असते, असेही बोलले जात आहे.
दरम्यान, बोरीअरब परिसरात नुकतेच नवीन मोठे पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तरीदेखील जुन्या पुलावरील रपटा का खुला ठेवण्यात आला, असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. रपटा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असता तर या दुर्घटनेला आळा बसू शकला असता, असे मत व्यक्त होत आहे. या घटनेने बोरीअरब परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्थानिक प्रशासनाने अशा धोकादायक रपट्यांवरून जाण्यावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
0 Comments