थरारक घटना : गर्भवती महिलेने घेतली मुलीसह विहिरीत उडी

यवतमाळ : लाडखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्रम्ही गावात मंगळवारी सकाळी हृदय हेलावून टाकणारी घटना घडली. गर्भवती असलेल्या पूजा मोहन नेमाने (वय २५) हिने स्वतःच्या दोन वर्षीय मुलगी नव्या हिला पोटाला शाल्याने बांधून गावाशेजारील विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

पूजा मोहन नेमाने (वय २५), नव्या मोहन नेमाने (वय २) रा. ब्रम्ही अशी मृतक माय लेकीचे नाव आहे. मंगळवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सुमारे ११ वाजता पूजाने आपल्या लेकीला पोटाला घट्ट बांधले. त्यानंतर दोघींनी गावालगतच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. पाण्याच्या खोलीत बुडाल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी  रुग्णालयात पाठविण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र, आज सकाळीच सासु व सुनेचे भांडण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  एका आईने आपल्या लाडक्या लेकरासह जीवन संपविण्याचा घेतलेला निर्णय गावकऱ्यांच्या मनाला चटका लावणारा ठरला. एकंदरीत या घटनेत तीन जिवाचा मृत्यू झाला आहे.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments