आरोपी पतीचे पोलिसात आत्मसमर्पण
यवतमाळ : पुसद शहरातील टिपू सुलतान चौकात मंगळवारी पहाटेच्या सुमारास पत्नीचा गळा चिरून तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पती स्वतः पोलीस स्टेशन वसंतनगर येथे हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना ८ जुलै रोजी पहाटे २.३० ते ३ वाजताच्या दरम्यान घडली.
मोहम्मद आसिफ मोहम्मद शेख कुरेशी (वय ३०) याने त्याची पत्नी सानिया परवीन मोहम्मद आसिफ कुरेशी (वय २१) हिचा धारदार शस्त्राने खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घटनेनंतर आरोपी आसिफने पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्यानंतर आरोपी आसिफ स्वतः पोलीस स्टेशन वसंतनगर येथे हजर झाला. ‘मैंने मेरी औरत को छुरी से गला काटकर मार डाला।’ अशी कबुली दिल्याने पोलीसही हादरले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. पीडित महिलेला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. याप्रकरणी पोलिस नाईक ज्ञानेश्वर कराळे यांनी सरकार तर्फे फिर्याद दिली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे., पोलीस निरीक्षक सतीश जाधव, सपोनी पुंडगे आणि तपास अधिकारी पोउपनि शिवप्रसाद आवळकर यांनी भेट दिली. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
0 Comments