ब्रेंकीग: युवकाची हत्या ; तलवारी, चाकूंनी हल्ला; चार आरोपींचा शोध सुरु



यवतमाळ : उमरखेड शहरातील आठवडी बाजार परिसरात रविवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये भीषण हाणामारी झाली. या चकमकीत २७ वर्षीय युवकाचा निघृण खून करण्यात आला. तलवार, चाकू, लोखंडी रॉडने सपासप हल्ला करून युवकाचा जीव घेण्यात आला. या प्रकरणी उमरखेड पोलिस ठाण्यात आरोपींच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

 शेख अजहर शेख अकबर (वय २७, रा. अब्दुल रहमान कॉलनी, उमरखेड) असे मृतकाचे नाव असून, तो मजुरीचे काम करत होता. फिर्यादी शेख खालीद शेख अकबर (वय ३५), जो मृताचा मोठा भाऊ आहे, त्याने दिलेल्या तक्रारीनुसार ही घटना घडली. रविवारी रात्री शहरातील पीरबाबा दर्ग्याजवळ कव्वाली कार्यक्रम झाल्यानंतर घरात परतलेल्या फिर्यादीस, शेख मोबीन याचा फोन आला. त्यामध्ये अजहरची तब्येत गंभीर असून त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. तातडीने रुग्णालयात पोहोचल्यावर अजहरच्या मानेवर, पोटावर व पाठीवर गंभीर जखमा असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर शेख तन्वीर उर्फ तंम्या या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताजपुरा वॉर्डात संध्याकाळी दोन गटांत वाद झाला होता. त्याचेच पर्यवसान मध्यरात्री आठवडी बाजार परिसरात झालेल्या पुन्हा एकदा गटगटातल्या हाणामारीत झाले. या हल्ल्यात शेख मुदस्सीर शेख जमील, शेख सोहेल शेख जमील (दोघे रा. ताजपुरा वॉर्ड), शेख उबेद निसार (रा. ताजपुरा वॉर्ड), शेख आरीश शेख खतीब (रा. हुतात्मा चौक) आणि त्यांच्या सोबत असलेल्या ३ ते ४ साथीदारांनी मिळून अजहरवर हल्ला केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.सदर प्रकरणी आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments