‘ट्रायबल फोरम’चं निवेदन, घटनात्मक प्रतिनिधित्वासाठी मागणी
यवतमाळ : नगर पालिका स्थापनेपासून तब्बल ९३ वर्षांचा काळ उलटूनही यवतमाळ नगर परिषदेत अनुसूचित जमाती प्रवर्गाला एकदाही अध्यक्षपद मिळालं नाही. घटनात्मक आरक्षण धोरण लागू असूनही या प्रवर्गाचं सातत्याने प्रतिनिधित्व डावललं गेलं आहे. त्यामुळे यवतमाळमधील ‘ट्रायबल फोरम’ने राज्य निवडणूक आयोगाकडे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करून न्याय्य आरक्षणाची मागणी केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय प्रवर्गांना आरक्षण देण्याची तरतूद भारतीय संविधानात आहे. मात्र यवतमाळ नगरपरिषदेच्या स्थापनेपासून आजतागायत अनुसूचित जमाती प्रवर्गाला अध्यक्षपदासाठी एकदाही आरक्षण मिळालेले नाही, ही बाब खेदजनक आहे, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
सन २०११ च्या जनगणनेनुसार यवतमाळ नगर परिषद क्षेत्राची लोकसंख्या २ लाख ४८ हजार ९३९ आहे. त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या ३८ हजार २१४ असून अनुसूचित जमाती प्रवर्गाची लोकसंख्या १९ हजार ७८५ इतकी आहे. विशेष म्हणजे २०१६ मध्ये नगर परिषद क्षेत्रात वाघापूर, लोहारा, वडगाव, पिंपळगाव, उमरसरा, भोसा आणि मोहा या ग्रामपंचायतींचा समावेश झाला. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
अनुसूचित जमाती प्रवर्गाला संधीच नाही
१९३२ ते १९३४ दरम्यान पी. जी. बारी हे यवतमाळ नगर परिषदेचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर आजपर्यंत एकूण ३१ व्यक्तींनी अध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यानच्या काळात खुला, ओबीसी, महिला खुला, अनुसूचित जाती महिला आदी आरक्षणातून अनेकांनी अध्यक्षपद गाठले, मात्र अनुसूचित जमाती प्रवर्गाला संधी मिळालेली नाही.
'हा घटनात्मक अन्याय'
“हा घटनात्मक अन्याय असून आदिवासी समाजाच्या प्रतिनिधित्वावर गंडांतर आले आहे. त्यामुळे यापुढील आरक्षण ठरवताना अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव ठेवावे,” अशी ठाम मागणी ट्रायबल फोरमने निवेदनात केली आहे.
निवासी उपजिल्हाधिका-यांना निवेदन
ट्रायबल फोरमने निवासी उप जिल्हाधिका-यांना निवेदन दिले. यावेळी ट्रायबल फोरमचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रमोद घोडाम, नगर परिषदेच्या माजी नियोजन सभापती चंद्रभागा मडावी, माजी सदस्य भानुदास राजने, पांढरकवड्याचे माजी सभापती अंकित नैताम, डॉ. निलेश परचाके, दिलीप मडावी, वसंत उईके, सुनिता मडावी, पुंडलिक मेश्राम, भाऊराव मरसकोल्हे, प्रल्हाद पेंदोर, संतोष कन्हाके, हर्षलता मडावी, सारिका लबडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments