आरटीओ कॅम्पवर एसीबीची धाड; तीन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक व एक खाजगी कर्मचारी जाळ्यात

यवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यवतमाळच्या पथकाने पुसद येथील आरटीओ कॅम्पवर आज शुक्रवार  १६ मे रोजी अचानक धाड टाकली. यामध्ये तीन सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि एक खाजगी व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील वाहन धारक नागरिकांना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातून देण्यात येणारे कागदपत्र तालुका स्तरावर देण्यासाठी त्या ठिकाणी कॅम्प घेण्यात येते. त्या पाश्र्वभूमीवर पुसद येथे विश्रामगृहात आरटीओ विभागाच्या वतीने कॅम्पचे आयोजन केले होते. पुसद विश्रामगृहात सुरू असलेल्या आरटीओ कॅम्प दरम्यान संध्याकाळी साडेचारच्या सुमारास एसीबीच्या पथकाने कारवाई केली. त्यामुळे उपस्थित वाहनधारकांमध्ये आणि एजंटांमध्ये एकच खळबळ उडाली.

कारवाई दरम्यान सहाय्यक निरीक्षक जाधव, मेहकरे, बाहेती यांच्यासह बलदेव नावाच्या खाजगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. या चौघांवर अतिरिक्त पैशाची मागणी केल्याचा संशय आहे. आरटीओच्या वतीने सेवा देताना दलालांच्या माध्यमातून लाच मागितल्याची माहिती मिळताच एसीबीकडून ही कारवाई केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी पुसद बस आगारातील एका अधिकाऱ्यालाही लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. अटक करण्यात आलेले अधिकारी व खाजगी व्यक्ती एका मोठ्या रॅकेटचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी वसंत नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरु आहे.

Post a Comment

0 Comments