राहुल वासनिक / यवतमाळ :
भारतातील कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँग आणि बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य असलेला आणि राजस्थान पोलिसांच्या ‘मोस्ट वाँटेड’ यादीत असलेला भुपेंद्र सिंग ऊर्फ रघु ऊर्फ भिंडा याला यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) चमूकडून अटक करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेदरम्यान ही मोठी कारवाई पार पडली. असून पोलिसांनी भिंडाला जेरबंद करून संभाव्य मोठा अनर्थ टाळला आहे. दिनांक ३१ मे रोजी यवतमाळचे पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू असताना पोलिसांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला भुपेंद्र सिंग ऊर्फ भिंडा यवतमाळच्या जांब रोड परिसरात खोटी ओळख लपवून राहात आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ नियोजन करून संशयिताच्या निवासस्थानाची माहिती मिळवली. दांडेकर ले-आऊट भागात भाड्याने घेतलेल्या घरात तो राहात असल्याचे समजल्यानंतर पोलीसांनी त्या भागात घेराव घालून काटेकोरपणे छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच भिंडा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले आणि प्रतिकार करत असतानाही ताब्यात घेतले.
तपासा दरम्यान आरोपीने स्वतःची खरी ओळख उघड केली. भुपेंद्र सिंग ऊर्फ रघु ऊर्फ भिंडा ऊर्फ रघुवीर जरनैल सिंग (वय ३५, रा. अहारना खुर्द, मेहटीयाना, होशियारपूर, पंजाब) असे त्याचे पूर्ण नाव असून तो लॉरेन्स बिश्नोई व बिन्नी गुज्जर टोळीशी संबंधित आहे. त्याने खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी आणि आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्ह्यांची कबुली दिली.
17 गंभीर गुन्हे
त्याच्यावर पंजाब आणि राजस्थान राज्यांतील विविध पोलीस ठाण्यांत तब्बल १७ गंभीर गुन्हे नोंदवलेले आहेत. यामध्ये ३०२, ३०७, ३२४, ३४, १४८, १४९ अशा विविध गंभीर कलमांचा समावेश असून काही प्रकरणांमध्ये त्याला २० वर्ष आणि १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, तो फरार राहून नव्या गुन्ह्यांची योजना आखत होता.
सुपारी, खून अन् आंतरराज्य गुन्हेगारी जाळं
भिंडाने २०२३ मध्ये राजस्थानमधील बाडमेर येथे हरपालसिंग ऊर्फ रिंकू याचा सुपारी घेऊन खून केल्याची माहिती तपासात पुढे आली. या गुन्ह्यांबाबत पंजाब आणि राजस्थान पोलिसांशी समन्वय साधत त्याच्या ओळखीची आणि गुन्हेगारी इतिहासाची खातरजमा करण्यात आली. तपासादरम्यान हे ही उघड झाले की भिंडाला अमेरिकेतून सौरव गुज्जर (बिल्लू गुज्जरचा भाऊ आणि गोल्डी ब्रारचा निकटवर्तीय) याच्या माध्यमातून डॉलरमध्ये आर्थिक मदत मिळत होती.
अमेरिकेवरून पाठवतात पैसे
गुन्हेगारी टोळ्यांचा वापर कॉन्ट्रॅक्ट किलींग, खंडणी वसुली यासाठी केला जात असून, आरोपींना फरार राहण्यासाठी महिना २० ते २५ हजार रुपये पाठवले जात असल्याचा तपशीलही समोर आला आहे.
संभाव्य गुन्हे टळले
या अटकेमुळे संभाव्य मोठ्या गुन्ह्यांना आळा बसला असून, यवतमाळ पोलिसांच्या तत्परतेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर संभाव्य संकट टळले आहे. पोलिस अधीक्षक कुमार चिंता (भापोसे) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ही कारवाई एस पी कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात एल सी बीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर, सपोनि योगेश गटलेवार, पोहवा विनोद राठोड, पोहवा निलेश राठोड, पोशि आकाश सहारे आणि मपोना ममता देदेवतळे यांनी केली.
भारतातील गँगवॉर
लॉरेन्स बिश्नोई आणि बिन्नी गुज्जर गँग भारतातील अत्यंत धोकादायक गुन्हेगारी टोळ्यांमध्ये गणल्या जातात. या टोळ्या शस्त्रसाठा, वाहनं, आर्थिक पाठबळ आणि माहितीच्या आधारे गुन्हेगारी घडवून आणतात. आरोपी भिंडा याच्या अटकेनंतर या टोळ्यांच्या कार्यपद्धतीचा तपास अधिक खोलवर जाणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
खुनासह गंभीर गुन्हे
भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा याच्यावर पंजाब व राजस्थानात तब्बल १७ गंभीर गुन्हे दाखल असून, त्यात अनेक खून, खूनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट व NDPSसारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे:
▪️ 14 मे 2015 रोजी गोराया पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा (कलम 302, 34 भादंवि सह 3/25 आर्म अॅक्ट) दाखल
▪️ बाडमेर येथील सदर पो.स्टे येथे 2023 मधील खून प्रकरण (कलम 302, 123 (ब) भादंवि) — 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
▪️ 14 जानेवारी 2013 रोजी मॉडल टाउन येथे खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा (कलम 307, 323, 324, 148, 149) — 10 वर्षे शिक्षा
▪️ 23 एप्रिल 2013 रोजी शहर पो.स्टे येथे 307, 323, 324, 34 भादंवि
▪️ 9 ऑक्टोबर 2013 रोजी मॉडल टाऊन येथे 307, 323, 324, 504, 506 भादंवि
▪️ 25 मार्च 2017 रोजी शहर पो.स्टे येथे 307, 324, 332, 353, 186, 436, 148, 149 भादंवि
▪️ त्याच दिवशी दुसऱ्या गुन्ह्यात 307, 364, 353, 427, 148, 149 भादंवि
▪️ 31 जुलै 2012 रोजी मेहटीआना येथे 308, 323, 341, 148, 149 भादंवि
▪️ 2 मार्च 2011 रोजी बुलोवल येथे 323, 324, 148, 149 भादंवि
▪️ 16 फेब्रुवारी 2012 रोजी मेहटीआना येथे 323, 324, 326, 148, 149 भादंवि
▪️ 30 फेब्रुवारी 2012 रोजी मेहटीआना येथे 323, 324, 326, 451, 34 भादंवि
▪️ 14 जानेवारी 2013 रोजी मेहटीआना येथे 326, 451, 427, 379, 506, 148, 149 भादंवि
▪️ 16 एप्रिल 2013 रोजी मेहटीआना येथे 435, 427 भादंवि
▪️ 27 मे 2015 रोजी गोराया येथे NDPS (कलम 22) अंतर्गत गुन्हा
▪️ 24 जून 2021 रोजी मॉडल टाउन येथे 25, 54, 59 आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा
तुरुंगात असतानाही त्याने गुन्हे केले आहे.
▪️ 20 नोव्हेंबर 2019 रोजी त्रिपुरी पो.स्टे येथे तुरुंग अधिनियम अंतर्गत कलम 52-अ नुसार गुन्हा (अप.क्र. 259/2019)
▪️ 13 फेब्रुवारी 2020 रोजी (अप.क्र. 58/2020) याच कायद्याअंतर्गत दुसरा गुन्हा दाखल
0 Comments