यवतमाळ : साकुर येथे नरबळीच्या संशयावरून मोठी खळबळ उडाली आहे. पोलीसांनी एका घरावर छापा टाकत संशयित अघोरी पूजेमध्ये गुंतलेल्या पाच जणांना अटक केली असून, घटनास्थळी खोदलेला मोठा खड्डा, ओटीचा थाट, लिंबू-नारळ यासह खोदकामाचे साहित्य आणि तीन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्यात विशेष अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १९ जुलै रोजी पोलीस ठाण्याला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, साकुर येथे एका घरात बाहेरगावच्या व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली सुरू आहेत. याची दखल घेत ठाणेदार सुनील नाईक यांनी तत्काळ कारवाई करत स्टाफसह सापळा रचून छापा टाकला. या वेळी त्या घरात चार इसम आढळून आले, तर दोन जण मागील दरवाजाने पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करत एकाला अटक केली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये आकाश कोटनाके (साकुर), सोनू उर्फ कुणाल खेकारे (नांदेड), वृषभ तोडसकर (घाटंजी), प्रदीप इळपाते (वाशिम), व बबलु उर्फ निश्चय येरेकर (आर्णी) यांचा समावेश आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
अघोरी पुजेचे साहीत्य जप्त
पोलीसांनी घटनास्थळावरून अघोरी पूजेसाठी वापरण्यात येणारे साहित्य, खोदलेली माती, खोदकामाचे साहित्य, व तीन दुचाकी ताब्यात घेतल्या. या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथांविरोधातील अधिनियम २०१३ व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक थोरात, उपविभागीय अधिकारी दिनेश बैसाने यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुनील नाईक यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सपोनि प्रविण मानकर, सफौ संजय राठोड, रमेश कोंदरे, रणजित जाधव, गजानन खांदवे, सचिन पातकमवार, पंकज नेहारे, तुशाल जाधव व रुपेश नेव्हारे यांनी केली.
0 Comments