ब्रेकींग न्युज : जंगलात पुरलेल्या ‘त्या’ युवकाची हत्या; तीन मारेकरी जेरबंद

यवतमाळ : पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात दगडाखाली एका युवकाचा मृतदेह पुरून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांनी तपासचक्रे फिरवुन या घटनेचा चार तासात उलगडा केला. पुर्वीचा वाद व जनावर चारण्यावरुन सदर युवकाची हत्या केल्याची कबुली मारेक-यांनी दिली. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील तपासासाठी पुसद ग्रामिण पोलिसांच्या ताब्यात दिले.  

शेख अयाज शेख हारुन (वय २१, रा. खंडाळा, ता. पुसद) असे मृतकाचे नाव आहे. तर शेख अल्ताफ शेख इरफान ऊर्फ अप्पू (वय ३५), शेख वसिम शेख इरफान (वय २४), व शेख अफताफ शेख अल्ताफ (वय १९) सर्व रा. खंडाळा अशी आरोपींची नावे आहे. दिनांक ८ जुलै रोजी संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास, पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत खंडाळा घाटात, काही दगडाखाली एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. शेख अयाज शेख हारुन (वय २१, रा. खंडाळा, ता. पुसद) या युवकाचा मृतदेह असल्याचे उघड झाले. अज्ञात व्यक्तींनी धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून त्याची हत्या केली होती. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह जंगलात दगडाखाली लपवण्यात आला होता. या घटनेनंतर मयताचे वडील शेख हारुन शेख हुसेन यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम १०३, ३(५), २३८ भा.न्या.स. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश चवरे यांना आदेश दिले होते. चवरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी भेट देत समांतर तपास सुरू केला. गोपनीय बातमीदारांच्या मदतीने काही संशयितांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शिताफीने संशयितांचे लोकेशन शोधले. संशयित शेख अल्ताफ शेख इरफान ऊर्फ अप्पू (वय ३५), शेख वसिम शेख इरफान (वय २४), व शेख अफताफ शेख अल्ताफ (वय १९) सर्व रा. खंडाळा यांना जंगलात लपून बसलेले असताना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी कबुली दिली. मयत अयाज व त्यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. काही दिवसांपूर्वी अयाज याने आपली जनावरे त्यांच्या शेजारील शेतात चरण्यासाठी आणली होती. याच कारणावरून त्यांनी संगनमत करून अयाजची कु-हाडीने हत्या केली. मृतदेह जंगलात लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या आरोपींना पुढील कारवाईसाठी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी.जे., एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धीरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, पोहवा मुन्ना आडे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, रमेश राठोड, पोशि सुनील पंडागळे, राजेश जाधव यांनी केली.

Post a Comment

0 Comments