सायखेडा धरण ओव्हरफ्लो ; खूनी नदी पुलावरून वाहतंय पाणी; वाहतूक तात्पुरती बंद

यवतमाळ : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जलसाठ्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण आज (बुधवार) सकाळपासून भरून वाहू लागले. तर झरी जामनी तालुक्यातही सकाळपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. मांडवी-खूनी नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून  समाधानकारक पाऊस होत आहे. यामुळे सायखेडा धरण जलसाठा भरत गेले. आज अखेर पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा धरण ओव्हरफ्लो झाले. यावर्षी अपेक्षेपेक्षा लवकर धरण भरल्याने आगामी खरीप हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. धरण परिसरात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने प्रवेशबंदी लागू केली आहे. सांडव्याजवळ न जाण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे. दरम्यान, तालुक्यातील इतर लघुप्रकल्प तसेच नद्या-नाल्यांमधील पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे सिंचनाबरोबरच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुकर होण्याची शक्यता आहे.

झरी जामणीत वाहतूक बंद

झरी जामणी तालुक्यातही  पाऊस सुरू आहे. मांडवी-खूनी नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पोलिस पाटील, सरपंच आणि कोतवालांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी केली. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तहसील प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर नजर ठेवण्यात येत असून, संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत. नदी-नाल्यांना पूर आल्याने काही भागांत काळजीचं वातावरण निर्माण झाले असले, तरी प्रशासन सज्ज आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Post a Comment

0 Comments