यवतमाळ : जिल्ह्यात काल (८ जुलै) रात्रीपासून
मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू असून, सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ३३.४० मिमी इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा
जलप्रकल्प १०० टक्के भरून वाहू लागला आहे. धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू झाल्याने
परिसरातील नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने
या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. प्रशासनाच्या वतीने नागरिकांसाठी
मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या असून, पुरजन्य परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी, याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
विशेषतः ज्या भागात पुरसदृश्य स्थिती आहे, त्या भागात नागरिकांनी जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवर्जून नमूद केले आहे.
विजांचा कडकडाट सुरू असल्यास
सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे, झाडाखाली थांबू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. अनेक
ठिकाणी नदी, नाल्यांच्या
पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने तसेच बैलगाड्यांनी अशा ठिकाणी
जाणे टाळण्याचे प्रशासनाचे आवाहन आहे. पुरामुळे वाहतूक बंद करण्यात आलेल्या रस्त्यांवर
गावपातळीवरील कर्मचारी, कोतवाल व सरपंच यांनी उपस्थित राहावे, असे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
तसेच हवामानविषयक माहिती मिळवण्यासाठी ‘सचेत अॅप’चा वापर करण्यास प्रशासनाने प्राधान्य देण्याचे सांगितले आहे. दरम्यान, काही नागरिक धरण परिसर, पुराचे पाणी असलेल्या ठिकाणी जाऊन सेल्फी
काढणे, रील्स
बनवणे असे प्रकार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकारांमुळे जीवितहानी होण्याचा
धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांनी
त्यांचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत, तसेच जिथे पुरामुळे जिवित किंवा वित्तहानी
होण्याची शक्यता आहे, अशा
ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात
राहून संबंधित माहिती वेळोवेळी अहवालाद्वारे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.दरम्यान, या सूचनांची अंमलबजावणी गाव पातळीवर
होण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक
आणि कोतवाल यांच्यामार्फत दवंडी दिली जावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने
स्थानिक नागरिकांनी सहकार्य करून आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी योग्य
ती खबरदारी घ्यावी, असे
आवाहन केले आहे. प्रशासन सज्ज असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे
पालन करावे, असेही
प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
चार प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. यामुळे जिल्ह्यातील काही महत्वाचे मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक तेवढ्याच कारणासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, सध्या खालील चार मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहे. 1. तालुका झरी-जामणी येथील मांडवी मार्गावरील खूनी नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे, त्यामुळे वाहतूक पूर्णतः बंद आहे. 2. तालुका वणी येथील पुनवट ते कवडशी मार्ग पाण्यामुळे खराब झाला असून, दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवण्यात आली आहे.3. तालुका बाभुळगाव येथील पाचखेड मार्गावरील चंद्रभागा नदी ओसंडून वाहत असल्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला आहे. 4. तालुका राळेगाव येथील नागठाणा व गुजरी मार्ग रस्त्यावर पाणी साचल्यामुळे सध्या बंद आहे.
0 Comments