यवतमाळ : महावितरणच्या दारव्हा ग्रामीण-२ केंद्रात कार्यरत सहाय्यक अभियंता राहुल डोंगरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. वीजबिल वसुलीतील सातत्यपूर्ण अपयश, वरिष्ठांच्या आदेशांकडे दुर्लक्ष आणि मुख्यालय सोडून बाहेरगावी गेलेल्या कृत्यावरून ही कारवाई करण्यात आली. यवतमाळ मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी या संदर्भातील आदेश काढले.
डोंगरे यांनी एप्रिल २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत वीज वसुली १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले नाही. याबाबत दोन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्यावर कोणतेही उत्तर सादर केले नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रशासकीय पातळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. महावितरणच्या २१ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या परिपत्रकानुसार सर्व अधिकाऱ्यांना मुख्यालयी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश असतानाही, डोंगरे हे २८ मे रोजी वर्धा येथे गेले होते. विशेष म्हणजे, याच दिवशी त्यांचे वरिष्ठ अधिकारी कार्यालयात भेट दिल्यानंतर त्यांनी “माझ्या क्षेत्रात वीजपुरवठा खंडीत नाही, त्यामुळे माझे मुख्यालयी राहणे आवश्यक नाही,” असे उत्तर दिले. हे उत्तर वरिष्ठांनी ‘गंभीर आणि बेपर्वा’ म्हणून नोंदवले आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कंपनीचे आर्थिक नुकसान झाले असून, ग्राहक सेवा आणि आकस्मिक वीजबाधा याबाबत आवश्यक तत्काळ प्रतिसादात अडथळा निर्माण झाला असल्याचे महावितरणच्या यवतमाळ मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण दरोली यांनी स्पष्ट केले. त्यांच्या आदेशानुसार, सेवाविनियम २००५ च्या तरतुदीनुसार डोंगरे यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे.
निलंबन कालावधीत डोंगरे यांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी सकाळी १० वाजता ढाणकी येथील उपविभागीय कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक असून, मूळ वेतनाच्या फक्त ३० टक्के इतकाच निर्वाह भत्ता मिळणार आहे. त्यांना अधीक्षक अभियंत्यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. असे आदेशात नमूद केले आहे.
0 Comments