गांजाची तस्करी : चार लाखांच्या गांजासह आरोपी जेरबंद

यवतमाळ : ग्रामिण भागात गांजाची तस्करी करून विक्रीसाठी गांजा घेवून जाणा-या आरोपीला अटक करण्यात आली. तर दुसरा आरोपी पसार झाला. पोलिसांनी ४ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.  ही कारवाई पुसद येथील आरसीबी पथकाने पुसद ग्रामिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या वनोली गावाजवळ केली.

संतोष गुलाब जाधव वय ५०, रा. चिचपात्र, ता. दिग्रस असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर बळीराम वसराम राठोड वय ३७, रा. सातघरी, ता. महागाव असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. १ मे रोजी पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी पथक क्रमांक एकचे प्रमुख अभिजीत सांगळे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम रात्रीच्या सुमारास गांजा विक्रीसाठी काळी दौलत दिशेने येणार आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेंद्र राउत यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले. वनोली गावाजवळ सापळा रचून मोटार सायकल थांबविली. यावेळी चालक बळीराम राठोड हा अंधारात पळून गेला. मात्र मागील सीटवर बसलेला इसम संतोष जाधव याला ताब्यात घेण्यात आले. पोत्यात गांजा वनस्पती आढळून आली. पोलिसांनी १७ किलो ३०० ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे ४.३२ लाख), मोटरसायकल (किंमत ३० हजार), व मोबाईल (किंमत ५ हजार) असा एकूण ४.६७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तर संतोष जाधव याला अटक करण्यात आली आहे. फरार असलेल्या बळीराम राठोडच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, सपोनि सुरेंद्र राउत यांच्या नेतृत्वाखाली आरसीबी पथक क्रमांक एक प्रमुख अभिजीत सांगळे यांच्या टीमने केली. नागरिकांनी अवैध मादक पदार्थांची माहिती दिल्यास त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments