फुलसावंगी (यवतमाळ) : शेतातून पायदळ परत येत असताना अज्ञात वाहनाने नातवंडासह आजोबाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नातू ठार झाला असून, आजोबा गंभीर जखमी झाले आहे. ही घटना आज शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास फुलसावंगी ते ढाणकी रोडवर घडली.
सुदाम प्रभाकर सुरोशे रा. ढाणकी वय १४ वर्षे असे मृतक नातवाचे नाव आहे. तर दिगांबर लक्ष्मण शिंदे वय ५५ वर्ष रा. फुलसावंगी असे जखमी आजोबाचे नाव आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने मुलीचा मुलगा मृतक सुदाम सुरोशे हा आजोबाच्या घरी फुलसावंगी येथे आला होता. आज शनिवारी आजोबा व नातू हे दोघे शेतात गेले होते. शेतातील किरकोळ कामे आटोपून ते दोघे घरी असलेल्या गुराढोरांना भुईमुगाच्या काडाचा भारा डोक्यावर घेऊन घराकडे पायी येत होते. अशातच सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास फुलसावंगी ते ढाणकी रोड वर अज्ञात वाहनाने आजोबा व नातू या दोघांना धडक दिली. या अपघातात नातवाचा मृत्यू झाला तर आजोबा गंभीर जखमी झाले. जखमीवर फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुसद येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबाकडे आलेल्या नातवाचा मृत्यू झाला असून गावामध्ये शोककळा पसरली आहे.
0 Comments