यवतमाळ : कळंब पोलीस ठाण्या अंतर्गत येणा-या पिंपळशेडा डोंगर-खर्डा रोडवरील कैलासपोड-राळेगाव मार्गालगत असलेल्या नाल्याजवळ पळसाच्या झाडाझुडुपात एका तृतीयपंथीयाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आली.
शेतकरी रवी कोवे हे शेतातील काम आटपून घरी जात असताना गर्दी पाहून थांबले. तेव्हा मृतदेह दिसून आला. मृतदेह महिलेसारखा असून तो तृतीयपंथीयाचा असल्याचा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला. घटनास्थळी कळंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश राठोड यांनी सहकाऱ्यांसह पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. घटनास्थळी जवळपासच पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी उभी असल्याचे काही शेतकऱ्यांनी पाहिले. ही गाडी नंतर पिंपळशेडा गावातून यु-टर्न घेऊन कैलासपोडच्या दिशेने गेल्याचेही निदर्शनास आले. गावाच्या बाहेर गाडीतून एक पायदान फेकण्यात आल्याची माहिती समोर आली असून, पायदान पोलिसांनी जप्त केले आहे.
मृताच्या हातावर तीन नाव
मृताच्या हातावर ‘महिला’, ‘पुरुष’, ‘राहुल’, ‘अविनाश’, ‘अश्विन’ अशी गोंदवलेली नावे दिसून आली आहेत. मात्र अद्याप मृत्तकाची ओळख पटलेली नाही. हत्येचे नेमके कारण व मारेकऱ्यांचा शोध लावण्यासाठी पोलीस कसोशीने तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास कळंब पोलिस करीत आहे.
0 Comments