तरुणांच्या खात्यावर कोटींचे व्यवहार ; क्रिकेट सट्टा प्रकरणात चार आरोपी अटक

पांढरकवडा : केळापूर तालुक्यातील विविध गावांतील युवकांना रोजगार हमी योजना (रोहयो)अंतर्गत नोकरी देण्याचे आमिष दाखवून बनावटपणे बँकेत खाती उघडून त्यावरून कोटींचे व्यवहार करण्यात आले. या गंभीर प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, क्रिकेट सट्ट्याशी संबंधित मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी वाघोली येथील श्रीकांत कर्लावार यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मयुर राजेश चव्हाण (२३, रा. चोपन) आणि मनोहर राठोड (४५, रा. जरंग, ता. घाटंजी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण गंभीर असल्यामुळे तपास एलसीबीकडे (स्थानिक गुन्हे शाखा) सोपविण्यात आला होता. एलसीबीचे एपीआय दत्ता पेंडकर यांच्या पथकाने १७ जुलै रोजी रात्री उशिरा मयुर चव्हाणसह उमेश अनिल आडे (३१, रा. वसंतनगर), निखिल यादव खैरे (३०, रा. उमरी रोड), अलताफ मोहम्मद अनिस अकबाणी (२३, रा. तुकूम तलाव, चंद्रपूर) यांना अटक केली. १८ जुलै रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने चारही आरोपींना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या आरोपींनी पांढरकवडा येथील महाराष्ट्र बँकेत २७ युवकांच्या नावे खाती उघडून त्यातून क्रिकेट सट्ट्याशी संबंधित संशयित रकमेचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ही खाती रोहयोच्या नावाखाली उघडल्याचा देखावा करण्यात आला होता. याच प्रकरणात काही पोलीस कर्मचाऱ्यांनी, गुन्हा दाखल होण्याआधीच, काही युवकांना चौकशीच्या नावाखाली ताब्यात घेऊन त्यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप झाला आहे. संबंधित युवकांनी याबाबत पोलीस ठाण्यात लेखी तक्रारही दिली आहे. गुन्हा दाखल नसताना चौकशीच्या नावाखाली ताबा घेतल्याने स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

सटोडिये गुंतल्याची शक्यता 

 संपूर्ण प्रकरण सट्टा रॅकेटशी संबंधित असल्याने यात पांढरकवड्यातील काही सटोडियेही गुंतले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याप्रकरणात आणखी काही मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलिस तपासाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments